भोरमध्ये ‘बायोमेट्रीक’ प्रणालीला ठेंगा   

ब्रिटीशकालीन हजेरीपटाचा वापर

पुरूषोत्तम मुसळे  
 
भोर : सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील कार्यालयांतून कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी ‘बायोमेट्रीक’ प्रणाली (समय) मे २००९ पासून  लागू केली असून त्याचा वापर अनिवार्य केला आहे. प्रत्यक्षात तालुका पातळीवरील कार्यालयातून  वरील आदेशाला ठेंगा दाखवल्याचे पाहणीतून आढळले आहे. बहुतांश कार्यालयांत अजूनही ‘ब्रिटीशकालीन हजेरीपटाचा’ वापर केला जात असल्याचे आढळले. कर्मचार्‍यांचे मासिक वेतन बायोमेट्रीक हजेरीशी जोडले आहे. केवळ एकच कार्यालयांत बायोमेट्रीकचा वापर सुरू आहे. तेथील काम अधिकारी कर्मचारी यांच्या बोटांच्या ठशा शिवाय होत नसल्यामुळे बायोमेट्रीक प्रणाली सुरू आहे.उर्वरीत दोन तीन कार्यालयांत बायोमेट्रीक मशिन्स ‘शोभेची’ वस्तू म्हणून भिंतीवर लटकवल्याचे दिसले. त्याची अम्मलबजावणी होत नसल्याचे संबधीतांनी सांगितले. कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत कामावर यावे,वेळ संपल्यानंतर घरी जावे. हजेरीबाबत पारदर्शीपणा असावा, मानवी हस्तक्षेप कमी व्हावा. त्यानुसार कर्मचार्‍यांचे वेतन द्यावे आदी बाबी बायोमेट्रीक प्रणालीशी निगडीत आहेत.सध्या सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. त्यासाठी दोन्ही वेळेस मशिनचा वापर करायचा आहे. करोनाच्या काळात मार्च २०२० मध्ये सरकारने या प्रणालीला तात्पुरती स्थगिती दिली होती.करोना कमी होताच मे २०२२ मध्ये बायोमेट्रीकचा वापर पुन्हा सुरू करण्याचे आदेश सर्व कार्यालर्‍यांना दिले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी शहरात झाली नाही.

पंधरापेक्षा जास्त कार्यालये

शहरात उपविभागीय अधिकारी,तहसील,सहाय्यक निबंधक, उपकोषागार,  दुय्यम निबंधक, पंचायत समिती, उपविभागीय वन अधिकारी, भूमी अभिलेख, तालुका कृषी अधिकारी, पोलीस ठाणे, भाटघर प्रकल्प, निरा देवघर प्रकल्प, नगरपालीका व उपजिल्हा रूग्णालय आदी कार्यालये आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयाचा अपवाद वगळता इतरत्र हजेरीपटाचा वापर करतात. बहुतेक कार्यालयातील कर्मचार्‍यांची रिक्त पदांची संख्या खूप आहे.

‘लेट मस्टर, हालचाल’ नोंदवही गायब

प्रत्येक कार्यालयात विशिष्ट नमुन्यातील ‘लेट मस्टर’ व ‘हालचाल’ नोंदवही ठेवणे बंधनकारक असून त्याची तपासणी सक्षम अधिकार्‍याने वेळोवेळी करून प्रमाणीत करायची असते. अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परीस्थितीत कर्मचार्‍यांना दहा मिनीटांची सवलत आहे. मात्र अशा कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी ‘लेट मस्टर’ची सोय आहे. महिन्यातून तीन दिवस लेट आल्यास एका दिवसाची रजा नोंदवली जाते. मात्र लेट मस्टरचा वापर केला जात नसल्याचे आढळले. कार्यालयीन कामासाठी बाहेर जावयाचे असेल तर त्यासाठी ‘हालचाल’ नोंदवही असते. कर्मचार्‍याने बाहेर जाण्याची व परत आल्याची वेळ, कामाचे स्वरूप नोंदवणे आवश्यक आहे. या नोंदवह्या ठेवल्याचे आढळले नाही.

गावपातळीवर सूचना नाही

राज्य ग्रामविकास विभागाने तालुक्याच्या ग्रामीण भागात काम करणार्‍या तलाठी व ग्रामसेवकांना जानेवारी २०२३ मध्ये बायोमेट्रीक प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तालुक्यातील एकाही गावात त्याची अंमलबजावणी झाली नाही. राज्यातील कर्मचारी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. ग्रामसेवक व तलाठयांनी कार्यालयात वेळेवर हजर राहून जनतेची कामे वेळेवर करावीत हे अपेक्षित आहे. ‘बॉयोमेट्रीक’ मशीन वापराबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. 

- किरणकुमार धनवडे, गटविकास अधिकारी.    

 

Related Articles